Search

गरिबा चा करोना


नवरा बांधकामाच्या साईट वर कामाला,

बायकोला ही सोबत जाणं आलंच कि,

रोजंदारीचं काम, केलं नाही तर

खायला महाग .


आमचं असं आहे, उघड्यावरच

आडोसा करून हागण मुतणं

अन साईटवरच पत्र्याच्या शेड मध्ये राहणं

जगायचं म्हणजे सगळं करावंच लागेल,

लाज करून चालेल का ?


या मोठ्यांच्या बायका

फॅशन च्या नावाखाली आपरे कपडे घालतात

त्यांना इज्जत असते हो !

आपल्याला कसली आली इज्जत ?


एरवी साडी नेसायची

अन अंघोळ मात्र उघड्यावरच करायची,

गरिबाला लाज नसते हो !

गरिबीला कसली अली लाज ?


एखाद्या शिकलेल्या पोरीवर

अन्याय झाला कि येते बातमी.

आमच्यावर तर रोजच होतो अन्याय

आम्हालाही सवय झालीय

सहन करत जगण्याची

कारण, गरिबीला कसला आला आत्मसम्मान ?


मोठ्यांच्या घरचे बायका माणसं

सगळं करून नमो निराळे

आपल्याला मात्र, तोंड दाबून बुक्क्याचा मार .

कारण गरीबाचा हक्क नसतो हो !

गरिबीला कसला आला हक्क ?


आता काय ते नवीन करोना का काय ते आलंय

लोक म्हणे तोंड बांधून बसलेत. आपण तर रोजच असतो धुळीत

आपण जगलो काय अन मेलो काय

कोणाचं काय जातंय !

कारण गरीबाच्या जीवाची किंमत नसते हो !

गरीबाचा असतो एकच भाव, फुकट भाव ....


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.